Pages

Wednesday, March 18, 2020

जागतिक चिमणी दिन

जागतिक चिमणी दिन
                मुंबईसारख्या महानगरांत चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनुभवता येत नाही. चिमणी – आपल्या सगळ्यांच्या परिचयाची.. कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो.
             भारतात नाशिक येथील ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’चे संस्थापक आणि निसर्गरक्षक मोहम्मद दिलावर आणि फ्रान्समधील ‘इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ या संस्थांनी, इतर स्वयंसेवी संस्थांसह – चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास केला. चिमण्यांना मदत करण्यास सुरुवात केली आणि चिमण्यांची कमी होणारी संख्या हा वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे काय, हे तपासून पाहण्यासाठी जगभर चळवळ उभारली.
             ‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक अगर संस्था पातळीवर आयोजित केले जातात, परंतु चिमणीसाठीच्या जनजागृतीची गरज कायमस्वरूपी आहे. कमी होणारी झाडे, माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढते आधुनिकीकरण, गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ, मोबाइल फोन टॉवर्स या सर्व गोष्टींमुळे चिमणी अडचणीत आली आहे. चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे, आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.

No comments:

Post a Comment